चिपळूण : येथील महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन व विक्रीवर बंदी आणली असून, गेल्या तीन दिवसांत महसूल विभागाने ६४ नौका जप्त केल्या आहेत. या नौका ताब्यात घेताना ग्रामस्थांनी कोणतेही सहकार्य न केल्याने नऊ मंडल अधिकारी, ३० तलाठी यांनीच या मोहिमेला पूर्णत्व दिले.गोवळकोट येथे शनिवारी रात्री महसूल विभागाने ६०६ ब्रास वाळू पडकली. यावेळी आठ डंपर जप्त करण्यात आले. रविवारी ही कारवाई आणखी गतिमान करण्यात आली. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली व पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांनी स्वत: तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांना मदतीला घेत नौकांवरील कारवाई पूर्ण केली.या बोटींबाबत कोणीही माहिती दिली नाही. स्थानिकांनी याकामी मदत करण्यास सहकार्य केले नाही. तरीही महसूल कर्मचाऱ्यांनी नौका जप्त केल्या आहेत. या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. वाळूवर कारवाई करताना या भरारी पथकात ४ मंडल अधिकारी व १६ तलाठी यांचा समावेश होता. चिपळूण तालुक्यात अवैध वाळू उत्खनन, वाहूतक व विक्री राजरोस सुरु आहे. महसूल विभागाने सातत्याने कारवाई करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
वाळूच्या ६४ नौका जप्त
By admin | Updated: August 11, 2015 01:04 IST