परवानगीची मागणी
रत्नागिरी : किरकोळ मोडी व्यवसाय पार्सल स्वरूपात सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माडी व्यवसायिक संघाने केली आहे. शासनाने परवाना शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तीन महिने व्यवसाय बंद असल्याने बॅंका व पतसंस्था यांचे कर्जाचे हप्ते फेडणे व्यावसायिकांना अशक्य झाले आहे.
ऑनलाइन योगा शिबिर
चिपळूण : राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव प्रणिता घाडगे यांनी महिलांसाठी ऑनलाइन योगा शिबिराचे आयोजन केले होते. खुशी हरभरे यांनी योगासनाबाबत प्रात्यक्षिके सादर करून मार्गदर्शन केले. शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
झाडी तोडण्याची मागणी
आरवली : आरवली, माखजन, कुंभारखाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने, वाहन चालकांना समोरचे वाहन दिसत नसल्याने, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. झाडी तातडीने तोडण्याची मागणी करण्यात येत आहे. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बीएसएनएलची सेवा ठप्प
आरवली : भारत संचार निगमची माखजन-आरवली भागातील सेवा गेले कित्येक महिने विस्कळीत झाली आहे. शाळा सुरू झाल्या असून, ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. मात्र, नेटवर्कच गायब बसल्याने ऑनलाइन अभ्यासावर याचा परिणाम होत आहे. दूरसंचार प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.