असगोली : गुहागर आगारातून दरराेज निवडक बसेस साेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आगाराकडून नियाेजन करण्यात आले आहे़ या नियाेजनानुसार चिपळूणकडे रोज नऊ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गुहागरहून चिपळूणला रोज सकाळी ६, ७, ८, ९ वाजता आणि दुपारी १२, २, ४ व संध्याकाळी ५ व ६ वाजता गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर चिपळूणहून गुहागरसाठी सकाळी ८, ९, १०, ११ वाजता आणि दुपारी २, ४ व संध्याकाळी ५, ६ तसेच रात्री ८.३० वाजता गाड्या सोडण्यात येतील.
गुहागरहून रत्नागिरीसाठी सकाळी ६.३० वाजता व्हाया चिपळूण तर सकाळी ८ वाजता व्हाया आबलोली गाडी सोडण्यात येणार आहे. रत्नागिरीवरून गुहागरला २.३० वाजता व्हाया आबलोली व ४.४५ वाजता व्हाया चिपळूण गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच गुहागरवरून बोऱ्या व आबलोली मार्गावर एस. टी. बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. याबाबतची माहिती गुहागर आगाराचे वरिष्ठ अधिकारी नांदलस्कर यांनी दिली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण प्रवासी महासंघाचे ग्रामीण विभाग अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केले आहे.