रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील दुकानातून आंतरराष्ट्रीय काॅलिंग सेंटर चालविले जात असल्याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता आणखी दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताचा अजूनही शाेध लागलेला नाही.
अवैध आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर चालवल्याप्रकरणी अलंकार अरविंद विचारे (३८, रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) आणि फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) यांना अटक केली आहे. या दाेघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विद्यानंद जोग यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करण्यासाठी न्यायालयाकडे आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यावर युक्तिवाद करताना संशयितांच्या बाजूने ॲड. संकेत घाग आणि ॲड. अविनाश शेट्ये यांनी न्यायालयीन कोठडीसाठी युक्तिवाद केला. यावेळी दाेघांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा बेकायदेशीर कॉल राउटिंगद्वारे डोमॅस्टिक व आंतरराष्ट्रीय कॉलची सेवा पुरवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी संबंधित गुन्हा दाखल केलेला नाही. संशयितांवर लावण्यात आलेली कलमे जामीनपात्र असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चालवलेल्या कॉलिंग सेंटरमध्ये बाहेरच्या देशातून मस्कत, कतार, सौदी, कुवेत व ओमान या ठिकाणाहून ३० कॉल आले आहेत. मात्र, येथून एकही कॉल केला नसल्याचे सांगितले. हे दोघेही पहिल्या दिवसांपासून पोलिसांना सहकार्य करत असून, पनवेल येथे सर्व्हर असल्याची माहिती त्यांनीच पाेलिसांना दिली हाेती. संशयितांनी या कॉलिंग सेंटरसाठी जे साहित्य वापरले आहे ते जिओ कंपनीचे असून, पोलिसांनी कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती मागून तपास केलेला नसल्याचे सांगत न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
मात्र, सरकारी वकिलांनी तपासासाठी आणखी दाेन दिवसांची पाेलीस काेठडी देण्याची मागणी केली. ही मागणी ग्राह्य धरून कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी वर्ग-१च्या सहायक दिवाणी न्यायाधीश पल्लवी गोवेकर यांनी दोन्ही संशयितांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.