रत्नागिरी : शासन दरबारी विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी अर्ज करताना जोडाव्या लागणाऱ्या ‘कोर्ट फी’ स्टॅम्पची राज्यभरात कमतरता जाणवत आहे. प्रामुख्याने पाच आणि दहा रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्पचा अभाव असल्याने अर्जदारांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.शाळा, महाविद्यालये सुुरु झाल्यापासून उत्पन्न, जात, नॉन - क्रिमिलेयर, रहिवास असे विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सेतू कार्यालयात गर्दी केली आहे. दाखला मिळविण्यासाठी अर्ज करताना अर्जावर पाच रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक असते. जिल्हा कोषागारात मात्र या स्टॅम्पची कमतरता असल्याने अर्जदारांना पाच रुपयांऐवजी सहा रुपयांचा (दोन रुपयांचे तीनप्रमाणे) कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर चिकटवावे लागत आहेत.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी पं. ज. यादव यांना विचारणा केली असता मुख्य कोषागारातच कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे रत्नागिरीत देता येत नाहीत. आजच कोर्ट फी स्टॅम्प आणण्यासाठी गाडी जाणार होती. पोलीस बंदोबस्तही मागवला होता. मात्र, मुख्य कोषागार विभागाकडून ‘तुर्तास’ येऊ नका, असे पत्र आल्याने आता हे स्टॅम्प कधी उपलब्ध होतील, असे सांगता येत नाही, असे यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)