चिपळूण : झाडाखाली भरलेल्या सावित्रीच्या शाळेचा अनुभव घेत खरवते येथील अनेक ग्रामस्थांनी आपल्या नावाची सही करायला सुरुवात केली आहे. सह्याद्रीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने प्रौढ साक्षरता दिनानिमित्त ‘सावित्रीची शाळा’ हा अनोखा उपक्रम राबवून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
देशात प्रौढ साक्षरता अभियानाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. गावागावात रात्रीच्या शाळाही भरविल्या गेल्या होत्या. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रौढ महिला व पुरुषांना साक्षर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजूनही अनेकांना आपल्या नावाची सही करता येत नाही. सहीच्या वेळी अंगठा पुढे केला जातो. म्हणूनच माजी सभापती आणि सावर्डे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक पूजा निकम यांनी प्रौढ साक्षरता दिनानिमित्त ‘सावित्रीची शाळा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
मुख्याध्यापिका मीरा जोशी आणि सहकारी शिक्षकांनी त्याची अमलबजावणी केली. खरवते येथील एका माळावरच्या झाडाखाली सकाळी अकरा वाजता प्रार्थना म्हणत शाळा सुरू करण्यात आली. मीरा जोशी यांनी उपस्थित प्रौढांना प्रार्थना शिकवली, तर शिक्षिका पूजा इंदुलकर यांनी सावित्रीचा वसा जपत अशिक्षित प्रौढांना सहीपुरते साक्षर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षिका विद्या कुसमुडे, रोहिणी नगरकर यांनी पाटी-पेन्सिल घेऊन अक्षरे कशी काढावीत, हे हाताला धरून शिकवले. तेच त्याच्याकडून लिहूनही घेत आपल्या नावातील अक्षरे वाचायला शिकवली आणि एक दिवसाच्या या शाळेत सहीपुरते साक्षर करण्याचा प्रयत्न सावित्रीचा वसा पुढे चालवणाऱ्या या शिक्षिकांनी केला आहे.
मोकळ्या मैदानावर आणि एका डेरेदार वृक्षाखाली ही अनोखी शाळा भरली होती. या शाळेला ग्रामस्थांनी त्याचबरोबर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनीतकुमार पाटील यांनी भेट देऊन कौतुक केले. या शाळेतून सहा महिला आणि नऊ पुरुषांनी किमान सही करण्याचा शुभारंभ केला.