खेड : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शनिवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जाेरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात ११५.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळीही कमालीची वाढली आहे.
शहरातून खाडीपट्ट्याकडे जाणारा नवीन देवणे पुलाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजल्यापासून बंद झाले आहे; मात्र दापोली मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. जगबुडीची पातळी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला इशारा पातळी ओलांडून ६.५० मीटरपर्यंत गेली आहे. या दोन्ही नद्यांचे पाणी कधीही शहरात शिरण्याचा धाेका असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा सावधानतेचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या-नाल्यांनाही पूर आला आहे. खाडीपट्टा भागातील होडखाड येथे एका ओढ्यात एक गाय आणि वासरू वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर काही जणांच्या घरात पाणी शिरल्याने घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी घर, गोठ्याच्या छप्परांचीही पडझड झाल्याचे वृत्त आहे. सोनगाव येथे विहीर खचल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गासह ग्रामीण रस्तेही खड्ड्यात गेल्याने रहदारीचा वेग मंदावला आहे. ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अवस्था तर अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक मंदावली आहे.