शासनाकडून आरोग्याबाबत दक्षता घेण्यासाठी सूचनाही करण्यात येत असून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, प्रशासन सक्रिय झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश दिले असल्याने लाॅकडाऊनची शक्यता आहे. होळीच्या सणानंतर दि.२ एप्रिलच्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचा प्रत्येक विभाग सतर्क झाला आहे.
गतवर्षी लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याचे पडसाद सर्वांनाच सोसावे लागले. गतवर्षी अनेक भारतीयांना आखाती प्रदेश, परदेशातील उद्योग व्यवसाय बंद झाल्याने मायदेशी परतावे लागले होते. इतकेच नव्हे तर कित्येक स्थानिकांंना नोकरी गमावल्याने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते पैकी काहीजणांनी धक्का पचवता न आल्याने आत्महत्येचा मार्ग अवलंबला. त्यामुळे कित्येक घरे, संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हळूहळू उद्योग, व्यवसायांची गाडी रूळावर येत असताना, पुन्हा लाॅकडाऊनचे संकेत जनमाणसांना धक्का देणारे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था आंबा, काजू, मत्स्य, पर्यटन या प्रमुख चार स्तंभांवर उभी आहे. मात्र, यावर्षी ऋतुमानातील बदलामुळे आधीच आंबा उत्पादन धोक्यात असताना लाॅकडाऊनमध्ये आंबा विक्री व्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहे. काजू बी खरेदी सुरू झाली असली तरी दर कमी आहेत. मासेमारी सुरू असली तरी खर्चाच्या तुलनेत मासळी सापडत नसल्याने मच्छिमारी संकटात आहे. कोरोनामुळे दिवाळीनंतर मंदिरे सुरू झाली. त्यानंतर पर्यटकांचे आगमन सुरू झाले. गतवर्षी पर्यटन लाॅकडाऊनमुळे आठ ते नऊ महिने बंद असल्याने संबंधित व्यवसायावर परिणाम झाला. एकूणच समाजातील प्रत्येक घटकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली असली तरी लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाला नाईलाजाने घ्यावा लागणार आहे. मात्र, प्राप्त परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांना उभारण्यासाठी मनोबल उंचावणे गरजेचे आहे. रुग्णवाढीमुळे लाॅकडाऊन हा पर्याय निवडावा लागला तरी सर्वसामान्यांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, याबाबत विचार करूनच निर्बंध जारी करणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली तर आपल्याला योग्य उपचार मिळतील, विलगीकरणात सुविधा प्राप्त होतील की नाही यामुळे कित्येक चाचणी करणे टाळत आहेत. शिवाय युवावर्गात कोरोनाबाबत बेफिकीरी अधिक आहे. त्यामुळे लाॅकडाऊन व त्याचे पडसाद टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सामाजिक सुरक्षितता गरजेची आहे.