रत्नागिरी : कोरोना तसेच अन्य कारणांमुळे मृत झालेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांची १०० पेक्षा अधिक प्रकरणे मध्यवर्ती कार्यालयात प्रलंबित आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. ५० लाखांचे विमा कवच देताना जाचक अटी घातल्याने आतापर्यंत फक्त दहाजणांनाच याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना विमा मिळाला नाही, याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने संघटनेने निर्णायक भूमिका घ्यावी, अशा संतप्त प्रतिक्रिया कामगारांतून उमटत आहेत. त्यामुळे महामंडळाने त्वरित कार्यवाही करावी. कोरोना संकट काळातही एस. टी. कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांचा थेट प्रवाशांशी संपर्क येत असल्याने अनेक कर्मचारी बाधित होत आहेत. राज्यभरात मृत कर्मचाऱ्यांची संख्या १४५ झाली आहे. कोविड योद्धा म्हणून एस. टी. कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली जाते. मात्र, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महामंडळाच्या वर्धापनदिनी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले होते. मात्र, परिपत्रकातील जाचक अटींमुळे हे कवच अवघ्या दहा कर्मचाऱ्यांना मिळाले आहे.
कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च मिळण्याबाबतचा निर्णय होऊनही अंमलबजावणी होत नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांनाही शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १४ दिवसांची खास रजा मिळणे अपेक्षित आहे. तीही दिली जात नाही. अद्याप एस. टी. कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलेले नाही. आतापर्यंत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकच बैठक घेतली. त्यामध्ये वेतनवाढीबाबत एकतर्फी चर्चा करण्यात आली होती. शासकीय कर्मचाऱ्यांबाबत वेतनवाढीचा दर, घरभाडे, भत्ता कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्याबाबत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे.