लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर असुर्डे खिंड येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता एस. टी. बसची कंटेनरला धडक बसून अपघात झाला. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाब नागोराव जोंधळे (३१, चालक, एस. टी. डेपो चिपळूण, रा. बुरुमतळी, चिपळूण) असे गुन्हा दाखल केलेल्या चालकाचे नाव असून, तोही जखमी झाला आहे. शिवाय या बसमधील प्रवासी गणपत रोंगा बने (६०, रा. असुर्डे, बनेवाडी, चिपळूण), सर्वेश सीताराम कदम (२७), लक्ष्मण बाबू घडशी (७०), मारुती राजू घडशी (५५, तिघेही रा. कोकरे, ओझरवाडी, चिपळूण) यांना दुखापत झाली आहे.
याबाबत श्रीधर गणपत सिंग-पटेल (३६, रा. मॉर्गन चाळ, सेक्टर नं. १, एस. एम. रोड, वडाळा, मुंबई) यांनी फिर्यादी दिली आहे. एस. टी. बसचालक गुलाब नागोराव जोंधळे हा आपल्या ताब्यातील बस चिपळूण ते कासे पेढांबे अशी मुंबई - गोवा महामार्गाने घेऊन जात होता. अशातच असुर्डे खिंड याठिकाणी बस आली असताना चालकाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. एस. टी. बस वेगाने चालवून आपली बाजू सोडून रस्त्याच्या उजव्या बाजूला आला व गोवा बाजूकडून येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात स्वत:च्या तसेच एस. टी. बसमधील ४ प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.