रत्नागिरी : विभागीय कार्यालय परिसरात असलेल्या रोकड विभागात पुन्हा दि. १ रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे संगणक, मॉनिटर, सीपीयु व कीबोर्डसह भस्मसात झाला आहे. त्यामुळे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. याच विभागात आग लागण्याचा आठवडाभरात दुसरा प्रकार आहे. रोकड विभागाला २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री ३.१५ वाजता लागलेल्या आगीत पाच लाखांचे नुकसान झाले होते. इटीएम मशिन्स, चार्जर, वे बिल गठ्ठा, तिकीट रोल आगीत भस्मसात झाले होते. ११४ इटीएम मशिन्स बाद झाल्या असून, मशिनअभावी दीड लाखाचे नुकसान झाले होते. त्याच विभागात आठवडाभरात लगेच आग लागणे, ही बाब आश्चर्यकारक आहे. आग लागली, की लावली गेली? वरचेवर घडणाऱ्या या प्रकारामागे नेमके काय षडयंत्र आहे, याबाबतही चर्चा सुरू होती.दि. २४ रोजी चार्जिंगला लावलेल्या इटीएम मशीनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे आग लागली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रोकड विभागातील इमारतींचे विद्युत वायरिंग बदलण्यात यावे, असा प्रस्ताव इलेक्ट्रीशन विभागाकडून पाठविण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप मान्यता दिलेली नाही. दोन वेळा आग लागल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तपासणी पथक सायंकाळपर्यंत रत्नागिरीत दाखल येऊन तपासणी करणार आहे. त्यामुळे शनिवारी अहवाल प्रशासनाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या शुक्रवारी आगीमुळे इटीएम मशिन जळून पाच लाखाचे नुकसान सोसावे लागले आहे. शुक्रवारी आगीत संगणक खाक झाला आहे. (प्रतिनिधी)
एस. टी.च्या रोकड विभागाला पुन्हा आग
By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST