रत्नागिरी/खालगाव: तालुक्यातील खालगाव येथे नववीत शिकणारा विद्यार्थी शनिवारपासून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत खालगाव येथील अंबी नदीच्या किनारी असलेल्या कांबळे डोहानजीकच्या जंगली भागात आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र पुढे आलेले नाही. त्याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने गूढ वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील रहिवासी व जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेला रोशन मिलिंद मुळ्ये (१४) हा विद्यार्थी दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर बेपत्ता झाला होता. शनिवारी शाळा सुटल्यानंतर तो घरी न जाता रस्त्यातून जाकादेवी स्टॅण्डकडे गेल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र, तो सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्याचे वडील मिलिंद मुळ्ये यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, ग्रामस्थांसह रोशन याचे पालकही गेले चार दिवस त्याचा शोध घेत होते. गुरुवारीही त्याचा शोध सुरू होता. त्यावेळी अंबी नदीच्या कांबळे डोहानजीकच्या जंगलात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्याने हा गळफास घेतला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शाळेचा गणवेश त्याच्या अंगावर असल्याने तो शाळा सुटल्यावर लगेचच या जंगलात आला आणि त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
अनेक प्रश्न अनुत्तरित रोशन या अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास का लावला? इथपासून अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. रोशन हा त्या दिवशी शाळेतून सुटल्यानंतर घरी न येता थेट जंगलात गेला. त्यामुळे त्याच्याकडे गळफास लावण्यासाठी साडी आली कोठून? तसेच ज्या ठिकाणी त्याने गळफास घेतला, तो परिसर जंगलमय असून, वस्तीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळे इतक्या लांब येऊन त्याने आत्महत्या कशी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही सापडलेली नाहीत.