देवरुख : आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तयारी पूर्णत्त्वाकडे जात असून, या प्रदर्शनासाठी येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनीच तयार केलेला रोबो करणार आहे.या विज्ञान प्रदर्शनासाठी ‘वायर्रड रिमोट कंट्रोल रोबो’ तयार करण्यात आला असून, हा रोबो साऱ्यांसाठीच औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. द्वितीय वर्ष आॅटोमोबाईल व मॅकेनिकल शाखांचे विद्यार्थी सिद्धेश कोळथरकर, अक्षय बारटक्के यांनी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांच्या संकल्पनेनुसार कमी कालावधीत हा रोबो तयार केला आहे. येणाऱ्या मान्यवरांना नमस्कार करणे, पुष्पहार अर्पण करणे, हस्तांदोलन करणे, तसेच कृतीद्वारे इनबिल्ट माईकद्वारे संभाषणातून हा रोबो विज्ञान प्रदर्शनस्थळी मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. येणाऱ्या हजारो प्रेक्षकांसाठी हा रोबोट म्हणजे एक औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मान्यवरांचे स्वागत करणार रोबो
By admin | Updated: January 14, 2015 23:35 IST