देवरूख : संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणी प्रचितगडावर जाणाऱ्या शिडीची दुरवस्था झाली आहे. ही शिडी जीवघेणी ठरत असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांना मिळताच शिडीच्या दुरुस्तीसाठी क वर्ग पर्यटनामधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच रस्त्यासाठीही १० लाख रुपये मंजूर केल्याचे सांगितले.
प्रचितगडावर नेणारी ही शिडी दोन टोकांना जोडण्याचे काम करते. पूर्वी येथे दगडी जिना होता. मात्र, त्याच्या पायऱ्या ढासळल्यामुळे अनेक वर्षे गडावर जाताच येत नव्हते. अखेरीस इतिहासप्रेमींनी अथक प्रयत्नांनंतर गडावर जाण्यासाठी शिडी बसविली हाेती. त्यामुळे गिर्यारोहक तसेच पर्यटकांना गडावर जाणे साेपे झाले हाेते. गेल्या काही वर्षांत ऊन, पाऊस आणि वारा यामुळे ही शिडी गंजू लागली आणि एक - एक करत नेमक्या सुरुवातीच्याच सहा पायऱ्या तुटून दरीत पडल्या. सद्य:स्थितीत पायऱ्या मोडून पडलेल्या असतानाच शिवप्रेमी या धोकादायक शिडीवरून गडावर जा-ये करत असून, हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो.
आमदार शेखर निकम यांनी क वर्ग पर्यटनातून जुन्या शिडीच्या दुरुस्तीऐवजी थेट नवीन शिडी बसविण्यासाठी तब्बल १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. गडाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीदेखील प्राथमिक स्थितीत १० लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत. आमदार निकम यांनी प्रचितगडाबाबत स्वतः लक्ष घालून कार्यवाही केल्याने शृंगारपूर येथील ग्रामस्थ विनोद म्हस्के, विनायक म्हस्के, सुशांत कोळवणकर, फणसवणे येथील सत्यवान विचारे यांनी समाधान व्यक्त केले.
---------------------------
निविदा निघाल्या
प्रचितगडावर जाण्यासाठी नवीन शिडी बसविणे आणि प्राथमिक स्तरावर रस्ता करणे यासाठी आमदार शेखर निकम यांनी केवळ २० लाखांचा निधी मंजूर करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी याबाबत तातडीने निविदाप्रक्रिया करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने याबाबतची रीतसर निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामालादेखील सुरुवात होणार आहे.
---------------------------
चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच ऐतिहासिक स्थळांचे जतन करायला हवे. संगमेश्वर तालुक्यातील प्रचितगड ही केवळ कोकणची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. क वर्ग पर्यटनामधून शिडी आणि रस्त्यासाठी तब्बल २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. प्रचितगड विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपण पाठपुरावा करत राहू.
- शेखर निकम, आमदार