लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाकाळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. शहरातील कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत घरपोच जेवणाची सुविधा उपलब्ध केली होती. आता सामाजिक बांधीलकी जोपासत येथील धनश्री अजित रतावा-जोशी व त्यांचे सहकारी मित्र विश्वास जोशी हे शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ज्यांच्याकडे वाहन नाही अशांसाठी धावून आले आहेत. या लोकांना घरापासून लसीकरण केंद्र व तेथून पुन्हा घरी जाण्यासाठी मोफत रिक्षा वाहतुकीची व्यवस्था त्यांनी केली आहे.
कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. त्यानुसार चिपळूण शहरातही नगर परिषदेच्या एलटाइप शॉपिंग सेंटर येथे लसीकरण सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसह १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना पहिला, तसेच दुसरा डोस दिला जात आहे. मात्र, सध्या या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व महिलांची तारांबळ उडत आहे. लस घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. येण्या- जाण्याची कोणती व्यवस्था नाही. यामध्ये त्यांचे हाल होत आहेत. लसीकरणासाठी घरातून केंद्रावर यायचे आणि जायचे कसे, असा प्रश्न अनेक वयोवृद्धासह महिलांना पडला आहे. लसीकरण केंद्रावर येण्यासाठी त्यांना कडक उन्हातून पायपीट करावी लागत आहे.
धनश्री रतावा- जोशी यांनी प्रत्यक्ष ते विदारक चित्र पाहिले. त्यांनी पुढाकार घेत, सहकारी मित्र, ‘आधार सोबती’ या वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सदस्य व खजिनदार, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे सहसचिव, केमिकल प्रोसेस इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट ॲण्ड लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे डायरेक्टर विश्वास जोशी यांच्या सहकार्यातून शहरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी रतावा- जोशी यांना त्यांचे पती अजित जोशी यांनी प्रोत्साहन दिले. ते घरडा केमिकल कंपनीमध्ये डेप्युटी प्लांट मॅनेजर आहेत. लहानपणापासून रतावा- जोशी यांच्यावर आजोबा बाबू रतावा व वडील प्रवीणचंद्र रतावा यांच्याकडून समाजसेवेचे बालकडू मिळाले.
-----------------------------
मोफत रिक्षा उपक्रमासाठी काय करावे?
शहरातील बहादूरशेख नाका, पाग नाका, बाजारपेठ, शंकरवाडी या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच ज्यांच्याकडे वाहन नाही, अशा लोकांना लसीकरणासाठी शहरातील एल टाइप शॉपिंग सेंटर येथील केंद्रावर जाण्यासाठी या मोफत रिक्षा उपक्रमाचा लाभ होणार आहे. यासाठी दोन रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाच्या एक दिवस अगोदर गरजूंनी शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाशेजारी राहणाऱ्या धनश्री रतावा- जोशी, विश्वास जोशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.