सुभाष कदम - चिपळूण -पावसाळ्यात कोकणात अनेक उलथापालथी होत असतात. कोकणचा भौगोलिक विचार करता येथे मुसळधार पाऊस पडतो. झाडांची पडझड होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. यातूनच घरांची, गोठ्यांची, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. यावर्षी ९ जनावरे व एका माणसाचा बळी गेला. ७१ लाख १६ हजार ३६७ रुपयांचे नुकसान झाले. त्यापैकी शासनाकडून ३ लाख २६ हजार २९१ रुपयांची भरपाई मिळाली आहे. यावर्षी चिपळूण तालुक्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. तब्बल १ महिना उशिरा पाऊस सुरु झाला. त्यामुळे पेरण्या वाया जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. लोक हवालदिल झाले होते. यातच पावसाने सुरुवात केली. त्यानंतरही पावसामध्ये सातत्य नव्हते. पावसामुळे ३६ गावे बाधित झाली. ३ घरे पूर्ण पडून २ लाख ९ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. २४२ घरांचे अंशत: १६ लाख ६ हजार ३४१ रुपयांचे नुकसान झाले. याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ५९ घरांना १ लाख २२ हजार २४१ रुपये नुकसान भरपाईची मदत देण्यात आली. पूर्णत: नुकसान झालेल्या ५ गोठ्यांना ६ हजार २५० रुपये मदत देण्यात आली, तर अंशत: नुकसान झालेल्या १२ गोठ्यांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. या पावसात एका पुरुषाचे अतिवृष्टीमुळे निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांना शासनातर्फे १ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. विद्युतभारित तारेचा स्पर्श किंवा पावसामुळे ९ जनावरे मृत्युमुखी पडून १ लाख ६९ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले होते. पैकी २ जनावरांच्या मालकांना ३२ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पावसामुळे ११ दुकानांचे ३४ लाख ५९ हजार ९२० रुपयांचे नुकसान झाले, तर १८ ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे १५ लाख ३० हजार ३२४ रुपये नुकसान झाले. शासनातर्फे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने पंचनामा झाल्यानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आतापर्यंतचा अनुभव सकारात्मक नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी नुकसान ग्रस्तांना महसूल विभागाकडून भरपाई मिळविताना खुप खेटा माराव्या लागत होत्या.
७१ लाखांच्या नुकसानापोटी केवळ तीन लाखांची भरपाई
By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST