रत्नागिरी : शहरातील सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी स्वाती ठाकूर हिची नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी आज (शनिवार) जिल्हा न्यायालयाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला. शहरातील सेक्स स्कँडल प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती. या प्रकरणामध्ये काही प्रतिष्ठित लोकांसह राजकीय पुढार्यांचाही सहभाग असल्याची चर्चा शहरात सुरू होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी जितू शेट्ये, सुशील मांडवकर, प्रकाश साळवी, राजा सावंत, स्वाती ठाकूर, मदन जोशी व हरेष छाभय्या यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी आम आदमी पार्टीने पोलिसांकडे केली होती. ‘आप’च्या मागणीची दखल पोलिसांनी घेतली आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वाती ठाकूर हिची नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. या सुनावणीप्रसंगी युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. विनय गांधी यांनी हा गंभीर गुन्हा असून, त्यामध्ये समाजाचा फायदा होणार असल्याने आरोपीची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयासमोर केली. मात्र, स्वाती ठाकूर हिने नार्को टेस्ट करण्यास नकार दिला होता. सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखादा आरोपी नार्को टेस्ट करण्यास स्वत:हून तयार नसेल तर ती करता येणार नाही. या प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्टसाठी संमती नसल्याने न्यायालयाने पोलिसांचा अर्ज आज (शनिवार) फेटाळला. (शहर वार्ताहर)
स्वातीच्या नार्कोची मागणी फेटाळली रत्नागिरी सेक्स स्कँडल : आरोपीची संमती नाही
By admin | Updated: May 11, 2014 00:03 IST