रत्नागिरी : जन्म-मृत्यू नोंदी संगणकीकरणामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद कोकणात प्रथक क्रमांकावर असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितली.मुख्य कार्यकारी अधिकारी काळम-पाटील यांनी दोन महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाण्यासाठी निघण्यापूर्वी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे संगणकीकरण होऊनही जन्म-मृत्यु नोंद, ८-अ च्या नोंदींचे संगणकीकरण करण्यास काही ग्रामसेवकांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर मात्र जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये या संगणकीकरणाच्या कामाला वेग आला होता.आज या नोंदींचे जिल्ह्यातील काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ७ लाख ७ हजार ३२ जन्मनोंदी, ३ लाख ८१ हजार ६०७ मृत्युनोंदी आणि ४ लाख ६५ हजार एवढ्या ८-अ च्या नोंदींचे संगणकीकरण ग्रामसेवकांनी केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कामामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद कोकणात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर वार्ताहर)
जन्म-मृत्यू नोंदीमध्ये रत्नागिरी प्रथम
By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST