रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने उसळी घेतली असून, दिवसभरात ४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०,३६५ झाली आहे, तर ७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात ९,७९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांतील शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ४७ रुग्ण ही जास्त संख्या आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. जिल्ह्यात ७५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील २९ रुग्ण असून, ॲन्टिजेन तपासणीतील १८ रुग्ण आहेत.
दिवसभरात आरटीपीसीआर तपासणीतील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महिला रुग्णालयातील ५ रुग्ण, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालय, धामापूर प्राथमिक आराेग्य केंद्र, खानू प्राथमिक आराेग्य केंद्र, वाटद प्राथमिक आराेग्य केंद्र, शिरगाव प्राथमिक आराेग्य केंद्र, देवळे प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये प्रत्येकी १ रुग्ण, देवरुख ग्रामीण रुग्णालयात २ रुग्ण, सावर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ रुग्ण आणि उंबर्ले, वावे, वहाळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण आढळले.
जिल्ह्यात ३७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.५८ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के आहे. ६५ कोरोनाचे रुग्ण गृहविलगीकरणात असून, १५३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.