रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेविरुद्ध संतापाची लाट पसरली असून याचे खापर शिवसेनेवर फोडताना भाजपने यापुढे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. युतीचा यापुढे कोणताही दबाव आमच्यावर नसेल, असे पक्ष पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रत्नागिरीत जाहीर सभा होऊनही पक्षाला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले आहेत. रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या बाळ माने यांनी मागील निवडणुकीतील पराभवापेक्षा या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यापुढे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर युती तुटल्याने केवळ पंधरा दिवसात भाजपने प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत व मतदारापर्यंत पोहोचता आले नाही. त्याचा परिणाम म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पराभव झाल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद लोकसभा निवडणुकीनंतर चांगलीच वाढली आहे. ज्याठिकाणी युती असताना विधानसभा निवडणूक भाजपचे उमेदवार लढवत होते त्या ठिकाणी भाजपची स्थिती चांगली आहे. मात्र आता युती तुटल्यानंतर उर्वरित जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे.याबाबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन यापुढे विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नव्हे तर यापुढे जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे आता युतीचा धर्म पाळणे, स्वत:चा पक्ष वाढविण्यापेक्षा युतीचा प्रचार करण्याकडे लक्ष देणे. यासाठी व्यर्थ वेळ जाणार नाही. यापुढे आम्ही जिल्ह्यात स्वबळावरच लढणार आहोत, असे सांगताना त्यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत पक्ष नव्या जोमाने उभा करुन निवडणुका लढविण्याचा मनसुबा जाहीर केला.रत्नागिरी, गुहागर आणि दापोली मतदारसंघात भाजपला चांगली मते आहेत. त्यामुळे या तीन जागा वगळून अन्यत्र विशेष लक्ष देण्यात येणार असून पक्षवाढीसाठी तसेच स्वबळावर लढण्यासाठी आवश्यक ती ताकद गावागावात उभी करण्याच्या दृष्टीने भाजपने व्यूहरचना सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या जिल्हा परिषद व विविध पंचायत समित्यांमध्ये असलेली शिवसेना - भाजप युतीचीही इतिश्री होण्याची शक्यता आता राजकीय गोटातून व्यक्त होऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर भाजपने तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जरी पराभव पत्करावा लागला असला तरीही लोकसभा निवडणुकीतील यशानंतर व विधानसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)युतीचा दबाव नाही...कोकणात पक्षसंघटना वाढविण्यासाठी आणि भाजपची राजकीय ताकद वाढविण्यासाठीच भर देणार आहे. आता आमच्यावर युतीचा दबाव नाही त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत केवळ भाजपचेच उमेदवार निवडून यावेत, हेच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवणार आहोत.- बाळ माने, प्रदेश प्रवक्ते भाजप
रत्नागिरी : जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा नारा
By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST