राजापूर : आपण काँग्रेसवर नाराज असल्याचा पुनरुच्चार करत राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी आपण सोमवारी नारायण राणेंची भेट घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय जाहीर करु असे स्पष्ट केल्याने गणपत कदम काँग्रेस सोडणार या ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. शनिवारी सायंकाळी माजी खासदार नीलेश राणे यांनी कदम यांची त्यांच्या ‘आमराई’ या बंगल्यावर भेट घेतली असली तरी त्या भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. दोन दिवसांपूर्वी लोकमतने राजापूरचे माजी आमदार गणपत कदम हे काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राजापुरात चांगलीच खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी राजापूरचा दौरा केला. राजापुरात प्रवेश करताच त्यांनी प्रथम माजी आमदार गणपत कदम यांच्या आमराई या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी गणपत कदम व नीलेश राणे यांची एक गुप्त बैठक झाली .कदम यांच्या भेटीनंतर राणे यांनी राजापूर काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला. ज्यावेळी नीलेश राणे कदम यांच्या बंगल्यावरुन काँग्रेस कार्यालयात आले त्यावेळी गणपत कदम त्यांच्यासोबत कार्यालयात न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता कदम यांचा शिवसेनाप्रवेश निश्चित मानला जात आहे.(प्रतिनिधी)
राणेंनाच न्याय नाही, मग आमचे काय?
By admin | Updated: July 27, 2014 00:50 IST