शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील वेळंब फाट्यावरील अकबर कारभारी यांच्या घरात गेल्या चार वर्षांपासून पावसाचे पाणी घुसत आहे. त्यामुळे या कुटुंबाला अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा इशारा कारभारी यांनी दिला आहे़ कारभारी यांच्या घरासमोरील गटाराचे पाईप लहान आकाराचे असल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे सर्व पाणी कारभारी घरात घुसत असल्याचा कारभारी यांचा दावा आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. येथे दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालल्याने बांधकामे होत आहेत. त्याचा परिणाम पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलण्यावर होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढत चालला आहे.आबलोलीमार्गे रत्नागिरीकडे जाणाऱ्या शृृंगारतळी येथील वेळंब फाट्यावर पूर्वीचे जुने पाईप टाकलेले आहेत. पूर्वेकडे बांधकामांना वेग आला आहे. त्यामुळे पाणी एकत्र होते. पाऊस पडल्यानंतर या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढतो. पाईपचे तोंड लहान असल्याने पाण्याला वाट मिळत नाही. त्यामुळे पाणी अकबर कारभारी यांच्या घरात घुसत आहे. वेळोवेळी पावसामुळे होणारी स्थिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखवली आहे. त्याठिकाणी मोठे पाईप बसवण्याची गरज आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. (वार्ताहर)
चार वर्षापासून शिरतेय पावसाचे घरात पाणी
By admin | Updated: July 28, 2014 23:14 IST