खेड : तालुक्यातील वाडी जैतापूर, कामिनी व वाडी बेलदारसाठी स्वतंत्र मतदान केंद्र द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार योगेश कदम यांच्याकडे देण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या या गावांना ५ ते १० किलाेमीटर पायपीट करून मांडवे व मौजे जैतापूर या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जावे लागते. महिपतगडाच्या पायथ्याशी वाडी बेलदार हे गाव वसलेले आहे. या गावांना मांडवे व मौजे जैतापूर ही मतदान केंद्रे लांब आहेत. त्यांना वाडी जैतापूर या मध्यवर्ती ठिकाणी केंद्र मिळाल्यास ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. मतदानासाठी डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागत असल्याने, वयोवृद्ध व दिव्यांगांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र मतदान केंद्र द्यावे, अशी मागणी केली आहे.