चिपळूण : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका प्रेमीयुगुलाने एकमेकाला प्रेम सिद्ध करण्याचे आव्हान दिले आणि पे्रमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या या महाविद्यालयीन युवकाने प्रेयसीसाठी शनिवारी वर्गातच फिनेल प्राशन केले. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय हादरुन गेले. या घटनेपाठोपाठ दोन दिवसातच त्या युवतीनेही फिनेल पिऊन आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.चिपळूण तालुक्यातील चिपळूण-विजापूर मार्गावर पूर्व विभागात एका गजबजलेल्या बाजारपेठेतील गावात ही घटना घडली. एका मान्यताप्राप्त राज्यव्यापी संस्थेचे हे कनिष्ठ महाविद्यालय असून, या महाविद्यालयात शिकणारा तरुण आणि तरुणी शालेय जीवनापासूनच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. शनिवारी फिनेल प्यायल्यानंतर तरूणाला तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्यासाठी प्रियकर फिनेल प्यायला, ही बाब प्रेयसीच्या मनाला लागली. ती अस्वस्थ झाली. तिचे मन तिला सतावू लागले आणि तिनेही सोमवारी फिनेल पिऊन आपले प्रेम सिद्ध केले. या प्रेमाची चर्चा कनिष्ठ महाविद्यालयासह पंचक्रोशीत पसरली आणि चलबिचल सुरु झाली. संस्थाचालक व शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांची समजूत घातली व प्रकरणावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)
प्रेम सिद्ध करण्यासाठी युवक-युवती प्यायले विष
By admin | Updated: June 26, 2014 00:22 IST