लांजा : ठाणे महानगरपालिका सहायक आयुक्त व त्यांचे अंगरक्षक यांच्यावर सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लांजा नगरपंचायतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मंगळवारी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. या वेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत नगराध्यक्ष मनोहर बाईत व तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटना, लांजा नगरपंचायत कर्मचारी संघटना यांच्यातर्फे १८ कर्मचाऱ्यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटना, लांजा नगरपंचायत कर्मचारी संघटना यांच्यातर्फे १८ कर्मचाऱ्यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे हे सोमवारी ठाणे येथील माजीवाडा प्रभाग येथील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या हाेत्या. त्या वेळी फेरीवाला अमरजित यादव याने सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला चढवला. तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे पूर्णतः तुटून गेली आहेत. त्याचबरोबर त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे याचेही एक बोट कापले गेले आहे. महिला कर्मचारी यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा निंदनीय व चिंताजनक आहे, असे नगरपंचायतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शासनाने कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा गांभीर्याने विचार आवश्यक होणे गरजेचे आहे. अशा हल्ल्यांमुळे अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे काम होत आहे. अशा हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला वेळेस पायबंद केला नाही तर असे हल्ले होतच राहतील, असे निवेदनात म्हटले आहे.