रत्नागिरी : जिल्ह्यातील तब्बल ६६ जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे़ लोकल बोर्डाच्या नावे असलेल्या ७ जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यात आल्या आहेत.तत्कालीन अध्यक्षा रचना महाडीक आणि तत्कालीन उपाध्यक्ष उदय बने यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी जागांच्या मालकीचा प्रश्न उपस्थित केला होता़ त्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या जागांची शोधमोहीम हाती घेतली होती़ जिल्हा परिषदेपूर्वी लोकल बोर्ड अस्तिवात होते़ त्या नावे असलेल्या जागाही जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यात आलेल्या नव्हत्या़गेले तीन वर्षे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा शोधमोहीम प्रशासनाकडून सुरु ठेवण्यात आली होती़ त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अनेक जागांवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही पुढे आले होते़ ही मोहीम पूर्ण झाल्याने किती जागा जिल्हा परिषदेच्या नावावर आहेत हेही समोर आले आहे़जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या एकूण ११७ जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये चिपळूण बांधकाम विभागाकडील ५८ जागांपैकी २२ जिल्हा परिषदेच्या नावावर असून त्या मालकीच्या आहेत़ रत्नागिरी बांधकाम विभागाकडे ५९ जागा आहेत़ त्यामध्येही २२ जागा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असून ७ जागा ग्रामपंचायतींच्या मालकीच्या आहेत़ उर्वरित २२ जागा अजूनही जिल्हा परिषदेच्या मालकीच्या नसून, त्या जागा नावावर करुन घेण्यासाठी कार्यवाही सुरु आहे़राज्य शासनाच्या ग्रामपंचायत विभागाने २५ मार्च, २०१३ च्या परिपत्रकानुसार बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नांवे नसलेल्या जागा, जिल्हा परिषदेच्या नांवे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव करण्याचे आदेश देण्यात आले होते़ जिल्हा परिषद प्रशासनाने या जागा नावे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे़ त्यामुळे आता या जागा लवकरच जिल्हा परिषद प्रशासनाच्या नांवे होणार आहे़ (शहर वार्ताहर)
जागांवर नावनोंदणी करण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: August 17, 2014 00:41 IST