रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेशनदुकानदारांच्या वाहतुकीचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांनी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीला दिले आहे, तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थापन समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, अशी सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.रत्नागिरीसह राज्यातील रास्तदर धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र, दुकानदारांना धान्याच्या वाहतुकीचा मिळणारा रिबेट २००५ सालापासून आहे तोच देण्यात येत असून तो अल्प आहे. रेशनदुकानांपर्यंत धान्य पोहोच करणे, रेशन दुकान व केरोसीन परवाना कायम करणे, विक्री कमिशन वाढवून मिळणे, साखर विक्री कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळणे, शासन निर्णयानुसार वाहतूक रिबेट मिळावा तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक व दुर्गम परिस्थितीनुसार विशेष वाहतूक रिबेट मिळावा, या सर्व मागण्या कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेने सोमवारी (दि. ११) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांची भेट घेतली. यावेळी पाठक यांनी वाहतूक रिबेटचा प्रश्न जुलैअखेर सोडवण्याचे आश्वासन संघटनेला दिले. तसेच व्यवस्थापनविषयक इतर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी यांना सूचना देणार असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेनेचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव नितीन कांबळे, शशिकांत दळवी, विकास पवार, संतोष उतेकर, विजय राऊत, योगेश शिंदे, अनंत केंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतूक प्रश्न जुलैअखेर सोडविण्याचे आश्वासन
By admin | Updated: July 13, 2016 00:47 IST