चिपळूण : वन संरक्षण आणि संवर्धन करतानाच नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभागाने यावर्षी आपल्या शासकीय रोपवाटिकेत पिंपळी येथे ५० हजार रोपांची निर्मिती केली आहे. झाडे लावा झाडे जगवा असा मंत्र देत गावोगावी लागवडीचा अट्टाहास करणारे वनखाते जुन्या व जंगली झाडे तोडण्यासाठी परवाना देते. मात्र हा परवाना चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. खेडेगावात मोठ्या प्रमाणावर लाकूड व्यवसाय केला जातो. यावेळी खासगी मालकीचे जंगल तोडले जाते. त्यामुळे वनविभाग त्यांच्यावर कारवाई करु शकत नाही. काही वेळा परवानगी घेवून तोड केली जाते. परंतु, झाडे तोडल्यानंतर पुन्हा नवीन झाडे लावावी असा आग्रह वनखात्यातर्फे केला जातो. पण वनखात्याच्या संदेशाकडे अनेकवेळा दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा झाड तोडीसाठी दिलेल्या परवान्याच्या बदली झाडे लावण्यासाठी झाडे हवी असतात. या पावसाळी हंगामात १९ हजार ६९४ तोड झालेल्या झाडांच्या बदल्यात लागवड चालू आहे. यासाठी पिंपळी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत साग, पिंपळ, शिवण, आवळा, गुलमोहर आदी ५० हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती परिक्षेत्र वनअधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
वनखात्याची ५० हजार रोपांची निर्मिती
By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST