रत्नागिरी : उर्दू भाषेच्या विकासासाठी रत्नागिरीतही ‘उर्दू भवन’ उभारण्यात येत आहे. या उर्दू भवनाला रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह अन्य १४ हिंदुत्ववादी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्याकडे गुरूवारी संयुक्तरित्या सादर करण्यात आले. यावेळी या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उर्दू भाषेचा विकास आणि उर्दू साहित्याचा प्रसार यासाठी राज्यातील मुख्य शहरांमध्ये उर्दू भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथे उभारण्यात आलेल्या पहिल्याच उर्दू भवनामध्ये अवैध धंदे चालू झाल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. तरी शूरवीर स्वातंत्र्यवीरांची भूमी असलेल्या, समृद्ध गणेशोत्सवाचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही असे प्रकार होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या उर्दू भवनास विरोध असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
उर्दूच्या विकासासाठी उर्दू घरे असे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र घरांच्या नावाखाली आलिशान इमारती उभारण्यात आल्या आहेत आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. अशा प्रकारे शासन आदेशातून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेला सांस्कृतिक वारसा आहे. मराठीतील संत वाड्.मय आणि साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. आज महाराष्ट्रात इंग्रजी भाषेचे स्तोम वाढले असून शासकीय कामकाजातही मराठीची अवहेलना दिसून येते. भाषाशुद्धी विषयी तर मराठीची दुरवस्था दिसून येते. राजभाषा मराठीची दुःस्थिती सुधारण्याऐवजी सरकार उर्दू भाषेचे एवढे उदात्तीकरण कशासाठी करत आहे ? असा प्रश्नही या निवेदनात करण्यात आला आहे.
या मागणीचा विचार करण्यात यावा, अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना संविधानिक पद्धतीने आंदोलन व निदर्शने करतील, असा इशारा यात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रत्नागिरीतील हिंदू राष्ट्रसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू जनजागृती समिती, राजापूर येथील गुरव ज्ञाती समाज, ओंकार मित्रमंडळ, शिवस्मृती मंडळ, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भंडारी युवा मंच, जय गणेश मित्रमंडळ गणपतीपुळे, अपरान्त रत्नागिरी, श्री चंडिकादेवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे, गणपतीपुळे ग्रामस्थ, आम्ही फक्त शिवभक्त रत्नागिरी, समस्त वारकरी फडकरी दिंडी संघटना लांजा तालुका, महाराष्ट्र वारकरी महामंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.