रत्नागिरी : रत्नागिरी कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धा २०२१ चा बक्षीस वितरण कार्यक्रम शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शहरातील जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.
कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेला यंदा गणेशभक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. आता या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमही कोरोनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय नियमावली पाळून होणार आहे.
सोहळ्याला शास्त्रीय, उपशास्त्रीय नृत्याविष्काराने रंगत येणार आहे. गणपती सजावट स्पर्धा असल्याने निवडक गणेश गीतांवर बहारदार नृत्य सादरीकरण होणार आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना धनश्री नागवेकर आणि भरतनाट्यम नृत्यांगना मिताली भिडे यांच्यासह त्यांच्या शिष्या बहारदार नृत्याने हा सोहळा अधिक सजविणार आहेत.
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आॅनलाईन होणार असून हा कार्यक्रम रसिकांना घरी बसून पाहाता येणार आहे. रसिकांनी या सोहळ्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कांचन डिजिटलचे फोटोग्राफर, या स्पर्धेचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.