रत्नागिरी : बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे शासनाच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरीची सुकन्या प्रियदर्शनी जागुष्टे हिला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.विविध क्रीडा क्षेत्रातील सुमारे ८५ पुरस्कारार्थींना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. याप्रसंगी खेळाडू प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी, पत्रकार तसेच पुरस्कार वितरणाच्या समारंभाला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शंकुतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, संग्राम थोपटे उपस्थित होते.यावेळी विनोद तावडे यांच्याहस्ते प्रियदर्शनी जागुष्टेला राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. प्रियदर्शनीला पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तिने पॉवरलिफ्टिंगमध्ये उत्तुंग केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे व भारताचे नाव उज्ज्वल केले. तिच्या या कामगिरीची महाराष्ट्र शासनाने दखल घेत प्रियदर्शनीला क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन २०१२-१३चा हा पुरस्कार प्रियदर्शनी हिला देण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल प्रशिक्षक संजय झोरे यांनी तिचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
प्रियदर्शनीला शिवछत्रपती पुरस्कार
By admin | Updated: December 10, 2015 00:53 IST