शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

तयारी आगोटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य एकत्रित मे महिन्यात खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू, कडधान्ये, साखर, मीठ, कांदे, बटाटे, ...

पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य एकत्रित मे महिन्यात खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये तांदूळ, गहू, कडधान्ये, साखर, मीठ, कांदे, बटाटे, लसूण यांचा साठा केला जातो. कडधान्य, डाळी, खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडल्याने पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणातील खरेदी थांबली आहे. मात्र, तरीही बजेटनुसारच खरेदी सुरू आहे. किराणाबरोबर मसाल्याचे पदार्थांना मागणी होत आहे. तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य, तेल, साखर यांची घाऊक स्वरूपात खरेदी करण्यात येते. गहू व भाकरीसाठीचे तांदूळ वेगळे वाळवून ठेवण्यात येत आहेत. तांदळाला कीड लागू नये, यासाठी बोरिक पावडर लावून ठेवण्यात येत आहे. डाळी, कडधान्ये यांची खरेदी करून ऊन्हात वाळत घातली जात आहेत. बाजारातून तयार मसाले विकत आणले तरी वर्षभर पुरेल इतके तिखट मात्र घरीच केले जाते. मसाल्याची लाल मिरची १८० ते ३५० रूपये, बडीशेप १८० ते २०० रुपये, जिरे १९० ते २२० रुपये, दालचिनी ५५० रूपये, लवंग ४०० रूपये, काळीमिरी ४५० रूपये, वेलची १२०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे घरातील आबालवृद्ध एकत्र आहेत. शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती असल्याने वाळवणासाठी महिला कर्मचाऱ्यांना वेळ मिळत आहे. मिरच्या, धणे, बडीशेप, जिरे, खडा गरम मसाला वेगवेगळा वाळवून भाजून एकत्रित गिरणीतून दळून आणला जातो. ३० ते ३५ रूपये प्रतिकिलो दराने मसाल्यांचे दळण सुरू आहे. सुट्यांच्या कालावधीत मसाले केले जातात. कोरोनामुळे मसाल्याच्या गिरणीतून गर्दी होऊ नये, यासाठी ग्राहकांना दळणावाले वेळ ठरवून देत आहेत. काही घरातून हळद पावडर केली जाते. अखंड हळकुंड एकत्र आणून, कात्रून दळण्यात येतात. मात्र, बचत गटाच्या माध्यमातून काही महिला हळदीची शेती करून तयार हळद पावडर करून विकत असल्याने अनेक भगिनींचे परिश्रम वाचले आहेत. २५० ते ३०० रूपये किलो दराने गावठी हळद विक्री सुरू आहे.

तांदळासाठी मागणी

तांदळांच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. चांगल्या प्रतिचा तांदूळ ३० ते ७० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. बासमती तुकडा ५० ते ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे तर अखंड बासमती अथवा बिर्याणी राईसची विक्री १०० ते ३०० रूपये किलो दराने सुरू आहे. साधारणत: वर्षभर पुरेल इतका तांदूळ एकत्रित खरेदी करण्यात येतो. तांदळाला बोरिक पावडर लावून तो सुरक्षित ठेवण्यात येत आहे. महागाईबरोबर छोट्या घरात साठवणूक करण्याची पंचाईत असल्यामुळे साधारणत: महिन्याला अथवा तीन महिन्याला पुरेल इतकाच तांदूळ खरेदी करण्यात येतो.

तयार पिठांना मागणी

कोकणात तांदळाची भाकरी प्राधान्याने खाल्ली जाते. त्यामुळे भाकरीचे तांदूळ धुवून ते वाळवून ठेवण्यात येतात. दोन वा त्यापेक्षा अधिक ऊनं लावून ठेवली तर भाकरीच्या पिठाचे तांदूळ खराब होत नाहीत. परंतु नोकरदार, व्यावसायिक महिलांना सध्या हे शक्य नाही. बाजारात तयार पिठे विकत मिळत असल्याने महिन्याच्या जिन्नसाबरोबर ज्वारी, तांदूळ, नाचणी एकूणच आवडीनुसार पिठे विकत आणण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील महिला मात्र भाकरीसाठीचे तांदूळ वाळवून ठेवत असल्याने घरोघरी तांदूळ धुवून वाळविण्याचे काम सुरू आहे. गव्हाच्या किमतीतही वाढ झाली आहे. गहू ३० ते ४५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. गहू विकत आणून दळणासाठी प्रतिकिलो सहा ते दहा रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे तयार गव्हाच्या पिठालाही मागणी होत आहे. पाच किलो तयार आटा १२० ते १५० रूपयांना मिळत असल्याने गहू आणून ते दळून आणण्यासाठी कष्ट घेण्यापेक्षा तयार पिठच खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे बेगमीच्या जिन्नसातून गव्हाचे प्रमाण कमी झाले आहे.

साखरेचे दर नियंत्रणात

साखरेचा खप नित्य असला, तरी गेल्या दोन वर्षात साखरेच्या दरात चढ-उतार झाला आहे. मात्र, साखरेचे दर नियंत्रणात असून, ३२ ते ३५ रूपये प्रतिकिलो दराने साखर विक्री सुरू आहे. पावसाळयात शेतकऱ्यांची धावपळ, शिवाय धो-धो कोसळणाऱ्या पावसात चहाचा खप अधिक असल्याने साखरेची खरेदी आवर्जून केली जाते. ५० किलो साखरेचे पोते १,५०० ते १,६०० रूपयांपर्यंत उपलब्ध होत असल्याने दोन ते तीन कुटुंबातून एकत्र साखर खरेदी करून विभागून घेण्यात येत आहे. साखरेबरोबर गुळही खरेदी केला जातो. पाव किलोपासून १० ते १५ किलोपर्यंतच्या गुळाच्या ढेपी विक्रीला उपलब्ध आहेत. केमिकलयुक्त गूळ पावसाळी वातावरणात टिकत नसल्यामुळे लागेल तितकाच गूळ खरेदी केला जातो.

खाद्यतेल भडकले

खाद्यतेलाचे दर भडकले आहेत. यापूर्वी १०० ते १२० रूपये लीटरने विकण्यात येणारे तेल सध्या १५० ते १७५ रूपये लीटर दराने विकण्यात येत आहे. सुर्यफूल, कापूस, सोयाबीन, शेंगदाणा तेल बाजारात उपलब्ध असून, एक लीटरच्या पिशव्या तसेच पाच लीटर ते १५ लीटरचे डबे, बॉक्स उपलब्ध आहेत. डब्यापेक्षा १० ते १२ लीटरच्या तेलाच्या बॉक्सना मागणी अधिक आहे. घरात ठेवण्यासाठी तसेच वापरण्यासाठी सोपे असल्याने तेल पिशव्यांचे बॉक्सच अधिकतम खरेदी केले जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. विविध खाद्यपदार्थ डालडा अथवा तुपात बनवले जातात. डालडा १०० ते १२० रूपये किलो दराने सुरू आहे. विविध कंपन्यांची ५० ग्रॅमपासून १ किलो, पाच किलो, १० किलोपर्यंत पॅकिंग उपलब्ध आहेत. विविध दुग्ध कंपन्यांतर्फे गाईचे, म्हशीचे तूपही बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. घरगुती तूप तयार केले जाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळेच कंपनीचे तूप खरेदी करण्यात येत आहे.