लांजा : आठ महिन्यांची गरोदर असणार्या महिलेला लांजा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने हाताच्या ठोशाने मारहाण केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरला चांगलेच धारेवर धरले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच लांजा पोलिसां कल्पना देण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरणावर पडदा टाकण्याची विनंती केली. मात्र, नातेवाइकांनी घटनेची वस्तुस्थिती डॉक्टरकडून लेखी लिहून घेतली आहे. कोलधे येथील अस्मिता अनंत घडशी ही महिला आठ महिन्यांची गरोदर असल्याने तपासणीसाठी १० एप्रिल रोजी लांजा ग्रामीण रुग्णालयात आली होती. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. जानराव हे होते. त्यांनी तपासणी करत असतानाच अस्मिता हिच्या कानाखाली तीन-चार थापट्या लगावल्या. हाताच्या थापटाचे व्रण तिच्या गालावर दिसून येत होते. येथील डॉक्टरांनी तिला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ रत्नागिरी येथे उपचारासाठी हलवले. अस्मिता हिला पाहण्यासाठी काही नातेवाइक आज रत्नागिरी येथे गेले असता गालावरील हाताच्या थापटाच्या असणार्या व्रणाविषयी विचारणा केली असता तिने लांजा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तिने सांगितलेल्या माहितीवरुन नातेवाइकांमध्ये संताप निर्माण झाला. तत्काळ शनिवारी ४० ते ५० नातेवाइकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. येथे उपलब्ध असणारे डॉ. जानराव यांना पाहिल्यानंतर नातेवाइकांच्या रागाचा पारा चढला. काहींचा संताप अनावर झाल्याने डॉक्टरांच्या अंगावर धाऊन गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने लांजा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी नातेवाइकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण त्या महिलेला मारहाण केल्याचे डॉक्टरनी लेखी द्यावे, अशी मागणी केली. त्यानुसार जानराव यांनी लिहून दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. (प्रतिनिधी)
लांजात गरोदर महिलेला डॉक्टरकडून मारहाण
By admin | Updated: May 12, 2014 00:16 IST