रत्नागिरी : येणारा प्रत्येक पावसाळा महावितरण कंपनीकरिता एक आव्हान असतो. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा, वीज यंत्रणा कोलमडू नये व ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे.महावितरणची बहुतांश यंत्रणा ही उघड्यावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. काही ठिकाणी त्या तारांना घासत असतात. त्यादृष्टीने संबंधित मालकांची पूर्वपरवानगी घेऊन फांद्या छटाईचे काम सुरु करण्यात आले आहे. तारांच्या घर्षणामुळे उंच माड, झाडे बहुधा पेटून होणारे अपघात टाळण्यासाठी छटाई करण्यात येत आहे.तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा यांचाही फटका यंत्रणेला बसतो. काही भागातला वीजपुरवठा यामुळे खंडित होतो. काहीवेळा पतंग उडविणाऱ्यांचा अतिउत्साह त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे अडकलेले पतंग, मांजा, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल ते वेळीच काढून टाकण्याची सूचना महावितरणने दिली आहे.तारांचे गार्डिंग ढिले झाल्याने तारा लोंबकळतात. शिवाय ढिले झालेले स्पॅन टाईट करण्याचे काम सुरु आहे. तसेच दोन खांबांमधील तारांचा झोल पडून जमिनीपासूनचे अंतर कमी होते. अशावेळी तारा ओढून घेणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी एखादा खांब बसवण्याची सूचनाही महावितरण कंपनीने केली आहे.खांबांचे ताण किंवा स्टे सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याबरोबर ढिल्या झालेल्या, लोंबकळणाऱ्या, तुटण्याच्या अवस्थेत असलेल्या तारांना वादळी वारे व पावसामुळे फटका बसू शकतो. ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तेल योग्य पातळीपर्यंत आहे का नाही, याची खात्री करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मरबद्दल आर्थिंग पावसाळ्यापूर्वी मजबूत करुन घेणे गरजेचे आहे. शिवाय पोल डिस्ट्रिब्युशन बॉक्स, फिडर पिलर्स, मिनी पिलर्स या सर्वांचे कामही तपासण्यात येत आहे.डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर, केबल जॉर्इंट याबाबतही खात्री करण्यात येत आहे. किमान साहित्य हाती बाळगून सुविधा तपासणीचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खांब कोसळणे, तारा तुटणे ट्रान्सफॉर्मर जळणे, डिस्क इन्सुलेटर, पीन इन्सुलेटर जळणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे महावितरण कंपनीने सर्व साहित्याचा जादा साठा करण्यास प्रारंभ केला असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.पायाभूत आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात एक हजार कोटी यंत्रणेचे विस्तारीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणने निधी दिला आहे. राज्यभरामध्ये या निधीचा अवलंब केला जाणार आहे. मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
महावितरणची मान्सूनपूर्व तयारी
By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST