दापोली : क्षुल्लक कारणावरून ५६ वर्षीय प्राैढाच्या डाेक्यात फरशी घालून खून केल्याची घटना काेंढे - बाैद्धवाडी (ता. दापाेली) येथे १ सप्टेंबर राेजी रात्री ८.४५ वाजता घडली. मिलिंद कासारे असे मृत्यू झालेल्या प्राैढाचे नाव असून, याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत गणेश गमरे यांनी फिर्याद दिली आहे. दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद कासारे हे हातात मेणबत्ती घेऊन संतोष कासारे यांच्या घरांमध्ये गेले हाेते. त्यांनी संताेष कासारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ‘तुमच्या घरातील माणसांना मारून मेणबत्त्या लावतो’, असे शब्द त्यांनी उच्चारले. याचा राग आल्याने संतोष कासारे (३६, रा. काेंढे - बाैद्धवाडी) यांनी घरातील काठीने व लोखंडी फरशीने मिलिंद कासारे यांच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये मिलिंद कासारे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दापाेली पाेलिसांनी संतोष कासारे याच्यावर गुन्हा दाखल करून गुरूवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.