स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
राजापूर : तालुक्यातील जुवाठी येथील आनंदवनमध्ये अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दयाळ हरी बाणे यांनी मार्गदर्शन करताना, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यातूनही विविध संधी निर्माण करून जिद्दीला कष्टाची जोड देत आपले जीवनस्वप्न साकार करावे, असे आवाहन केले.
निधीची मागणी
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावात चालुक्य राजवटीत उभारलेल्या शिवमंदिरांना भेट देण्यासाठी देश- विदेशातील पर्यटक व इतिहासतज्ज्ञ येत असतात. शंभू महादेवाचे संपूर्ण कुटुंबच एकत्र असलेल्या दुर्मीळ संगम (संगमेश्वर) मंदिराची डागडुजी व परिसराचा विकास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सप्रे यांनी रस्ते व पुरातन वास्तू विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आहे.
रस्त्याची दुरवस्था
राजापूर : तालुक्यातील तुळसवडे ते जांभवली फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार काढण्यात आलेली नसल्याने पावसाळ्यामध्ये पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरील डांबरीकरण उखडून गेले आहे. त्यामुळे डांबरीकरण शोधावे लागत आहे.
केक प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोफत केक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. ५० युवती व महिला सहभागी झाल्या होत्या. नेहा जाधव यांनी डाॅल केक, रसमलाई, जेल, ब्लॅक फाॅरेस्ट केक तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
टाॅवर सुरू करण्याची मागणी
दापोली : तालुक्यातील ऊन्हवरे, दाभिळ, पांगारी व दुर्गम परिसरातील भारत संचार निगमची सेवा ठप्प आहे. महावितरणचे वीज न भरल्यामुळे दाभिळ, पांगारी येथील टाॅवरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र यामुळे परिसरातील ग्राहकांची गैरसाेय होत असून तातडीने टाॅवर सुरू करण्याची मागणी होत आहे.
इलेव्हन संघ विजेता
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी खतातेवाडी येथील तरुण उत्कर्ष मंडाळातर्फे आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे विजेेतेपद चिपळूण इलेव्हन संघाने पटकाविले. तरुण उत्कर्ष मंडळ खेर्डी संघाला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ओले काजुगरांना मागणी
रत्नागिरी : शिमगोत्सवासाठी मुंबईकर गावी आले आहेत. हंगामी भाज्यांमध्ये कुयरीसह पावटे, वांगी यांना मागणी होत आहे. शिवाय ओले काजुगरांचाही खप वाढला आहे. २० रुपयांना ६ ते ७ नग दराने किरकोळ, तर ६५० ते ७०० रुपये किलो दराने काजूगर विक्री सुरू आहे.
नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : शहरातील संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे नंदादीप नेत्रालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. ८५ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी डाॅ. प्रीती बसंत राज व त्यांच्या टीमने तपासणी केली.