मंंडणगड : सध्या सर्वच ठिकाणी भक्त गणेशोत्सव साजरा करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात विजेचा खेळ सुरू झाला आहे. ग्राहकांना कुठलीही सूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे उत्सवावर त्याचा परिणाम होत आहे. महावितरणने गणेशोत्सव लक्षात घेऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पूरग्रस्तांना मदत
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांसाठी अजूनही महाराष्ट्राच्या अनेक भागांतून मदतीचा ओघ सुरूच आहे. औरंगाबाद कोकण मित्रमंडळ आणि मुकुंदवाडी येथील डी. डी. फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह ब्लँकेट, चटईचे वितरण करून दिलासा मिळाला आहे. सुमारे ४०० पूरग्रस्त कुटुंबांना या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
प्रचारासाठी कार्यक्रम
दापोली : आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाच्या धर्तीवर स्थानिक उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होणार आहे. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत राहणार असून शेतकऱ्यांना ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. याबाबतची जागृती कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आली.
लसीकरणाला वेग
रत्नागिरी : जिल्ह्यातील १५० किल्ल्यांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तसेच खासगी केंद्रावरही लसीकरण केले जात आहे. राज्य शासनाकडून मुबलक प्रमाणात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्हीही लसींचा पुरवठा केला जात असल्याने आता अधिकाधिक नागरिकांना लस उपलब्ध होऊ लागली आहे.
खड्डे बुजविण्यास प्रारंभ
लांजा : तालुक्यातील कोर्ले प्रभानवल्ली, खोरनिनको या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे वाहतूक करणे धोकादायक ठरत होते. रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. अखेर बांधकाम विभागाला जाग आली असून हे खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला आहे.
गणेश मंदिरात उत्सव
दापोली : तालुक्यातील पालगड येथील गणपती मंदिराच्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झाली आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा आजही येथील ग्रामस्थ जपत आहेत. उत्सव सुरू झाल्यापासून सहस्त्र वर्तने व महापूजा, आरती, अभिषेक, नैवेद्य, धुपारती, मंत्रपुष्प असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
परतीच्या गाड्या
राजापूर : गणेशभक्तांसाठी परतीच्या प्रवासाकरिता १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर नाटे, आडिवरे, पावस, रत्नागिरी, बोरिवली, विरार, अर्नाळा एस.टी. बस सुरू करण्यात येत आहे. या गाडीचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध आहे. ही गाडी विजयदुर्गहून दूपारी ४ वाजता सुटणार असून जैतापूरहून सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्याने सुटेल.
मच्छीमार हवालदिल
दापोली : गेले चार दिवस बिघडलेल्या वातावरणामुळे मच्छीमारीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यातच शासनाने अलर्ट दिल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका जयगड, दाभोळ व आंजर्ले खाडीत सुरक्षिततेसाठी हलविल्या आहेत. मासेमारीला नुकतीच सुरुवात झाली असतानाच वादळामुळे पुन्हा मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत आहे.
कॉजवेच्या तारा उखडल्या
दापोली : तालुक्यातील साखळोली नदीवरील कॉजवेच्या तारा उखडल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. या कॉजवेचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. या नदीवर पूर्वी छोटी मोरी होती. ती तुटल्याने या ठिकाणी नुकताच कॉजवे बांधण्यात आला आहे.
खड्डे बुजविण्याची मागणी
गुहागर : चिपळूण - गुहागर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरचे खड्डे बुजविले जातील, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, गणेशोत्सवातही संबंधित यंत्रणेला खड्डे बुजविण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे हे खड्डे अधिकच त्रासदायक बनले आहेत.