लांजा :
तालुक्यातील कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको - या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण तथा बब्या हेगिष्ट्ये यांनी आंदोलनाचा इशारा दिला हाेता. या इशाऱ्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील लांजा कोर्ले - प्रभानवल्ली - खोरनिनको या मार्गावरून तालुक्याचा पूर्वभाग जोडलेला आहे. या मार्गावरून लहान-मोठ्या वाहनांची दिवस-रात्र वर्दळ असते. या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याबाबत बांधकाम खात्यासमोर अनेक वेळा समस्या मांडूनही दुर्लक्ष होत आहे. अखेर प्रशासनाला कंटाळून गणपती डोक्यावर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता.
दरम्यान, रस्त्याबाबत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांनी सांगितले की, जरी सध्या या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम होत असले तरी आपण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा करून निधी आणणार, असे त्यांनी सांगितले.
पूर्व भागातील ग्रामस्थांना लांजा येथे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. यासह लांजा - कोर्ले येथून पुढे कोल्हापूर जिल्हा व कोर्ले - पाचल मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडला गेला आहे.