खाडीपट्टा : येथील लोटे औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता परस्पर वाशिष्ठी, दाभोळ व जगबुडी नद्यांच्या संगमावर सोडण्यात येते. त्यामुळे जगबुडी व दाभोळ खाडीतील पाणी प्रदूषित होत आहे. हे जलप्रदूषण थांबवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असतानाही या आदेशाची पायमल्ली करुन दूषित पाणी सोडण्याचा प्रकार सुरुच आहे. दि. २२ रोजी खाडीपट्ट्यातील तुंबाड भोईवाडी जेटीनजीक मासे मृत पावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी जी. पी. पाटील यांनी मृत माशांची पाहणी करुन पंचनामा केला होता. तो अहवाल त्यांनी खेड तहसील कार्यालयाला सादर केल्याची माहिती तुंबाडचे माजी सरपंच विजय जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी लोकमतला दिली. गेल्या आठवड्यात खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागातील तुंबाड भोईवाडी जेटीजवळील जगबुडी नदी पात्रातील पाण्याचा रंग काळसर दिसून आला होता. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणामुळे नदी पात्रातील कालचर, बोयस्ट, कोलंबी तसेच अन्य जातीचे मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसत होते. लोटे औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया न करताच परस्पर सोडण्यात येते. या जलप्रदूषणामुळे मासे मृत पावले असावे, असा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला. सन २००६ पासून या नदीपात्रात मासे मृत पावल्याच्या वेळोवेळी घटना घडत आहेत. अशा प्रकारे मासे मृत पावल्याने या परिसरातील ६०० कुटुंबातील मासेमारीच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलप्रदूषण करु नये, असा आदेश दि. ३१ जुलै २०१२ रोजी उच्च न्यायालयाने देऊनसुद्धा हे आदेश धाब्यावर बसवून जलप्रदूषण सुरुच आहे. आता या प्रदूषणाबाबत नियंत्रण महामंडळ कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
जगबुडी, दाभोळ खाड्या प्रदूषित
By admin | Updated: August 28, 2014 22:21 IST