रत्नागिरी : चार्टड अकौंटंट अभ्यासक्रमाकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे, याकरिता लवकरच धोरण ठरविण्यासाठी महिन्याभरात निर्णय घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाबाबत धोरण ठरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
चार्टड अकौंटंट इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी सेंट्रल कौन्सिल मेंबर चंद्रशेखर चितळे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल कमिटीचे अध्यक्ष मनीष गाडिया, उपाध्यक्ष दृष्टी देसाई, सचिव अर्पित काब्रा, अध्यक्ष यशवंत कासार, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आनंद पंडित उपस्थित होते.
रत्नागिरी सी. ए. शाखा कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिले. देशासाठी चार्टड अकौंटंटचीसुध्दा जास्त गरज असल्याने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे याकरिता इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठातर्फे कसे पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करू. वर्षभरात असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
चिपळुणातील पूरग्रस्तांना रत्नागिरीतील सी. ए.नी सढळहस्ते मदत केली आहे. आपण जे मिळवतो ते समाजासाठी दिले पाहिजे ही त्यामागची भावना होती, असे सांगत सी. ए.च्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बिपिन शाह, अँथनी राजशेखर यांनी मार्गदर्शन केले. कमलेश मलुष्टे आणि अक्षय जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर रत्नागिरी शाखा उपाध्यक्ष प्रसाद आचरेकर यांनी आभार मानले.