चिपळूण तालुक्यातील काैंढर काळसूर येथील हातभट्टीवर छापा मारून अड्डा उद्ध्वस्त केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे : चिपळूण तालुक्यातील कौंढर काळसूर येथील हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत २,२३,८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. ही कारवाई शुक्रवारी उशिरा करण्यात आली. कारवाईदरम्यान हातभट्टीजवळ असलेली अनोळखी व्यक्ती जंगलाच्या दिशेने पळून गेली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी मार्गताम्हाणे येथे हातभट्टीवर धाड टाकून येथील हातभट्टी उद्ध्वस्त केली हाेती. दरम्यान, शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी हे आपल्या पथकासमवेत ग्रामीण भागात गस्त घालत असताना कौंढर काळसूर येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. यानुसार या हातभट्टीच्या ठिकाणी पोलीस छापा टाकण्यासाठी गेले असता हातभट्टी येथील अनोळखी व्यक्ती पोलिसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेली. याठिकाणी गावठी दारू, नवसागर, टाक्या आदी दारू बनविण्याचे साहित्य पकडण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन भारी यांच्यासह पोलीस नाईक इमरान शेख व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.