आवाशी : आवाशी येथे महावितरणच्या वाहिनीत बिघाड झाल्यामुळे लागलेल्या आगीत बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्घटना गुरुवारी घडली. त्याचबरोबर पीरलोटे येथे डोंगराला लागलेल्या वणव्याचा भडका उडून तो डेरापेंटस् कंपनीपर्यंत पोहोचल्याने व्यवस्थापनाची चांगलीच धावपळ उडाली.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आवाशी येथील पेट्रोलपंपापुढे गोविंद धोंडू आंब्रे (आवाशी) यांच्या बागेत महावितरणच्या वाहिनीवर स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत जवळपास बारा लाखांचे नुकसान झाले आहे. त्याच्या या सात एकर जागेत असणारी पंचवीस आंबा कलमे, पाचशे काजू कलमे, दहा चिकू कलमे, पाचशे मीटर पाईपलाईन व एचडीपी वाहिनी जळून सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.या घटनेनंतर महावितरण अधिकाऱ्यांसोबत मंडल अधिकारी आर. पी. मोहिते, लवेलचे तलाठी जे. पी. पाटील यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी आवाशीचे उपसरपंच भास्कर आंब्रे, मोहन शिगवण, अरविंद आंब्रे, जीवन आंब्रे उपस्थित होते. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तज्ज्ञांच्या पाहणीनंतर नेमके काय घडले हे सांगता येईल, असे सांगण्यात आले.
पीरलोटे, आवाशीत आगीमुळे लाखोंची हानी
By admin | Updated: November 21, 2015 00:21 IST