राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील प्रदीर्घ काळ बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या गणेशोत्सव काळात सुरू होत असल्याने या मार्गावरील सौंदळ हॉल्ट (स्थानक) पुन्हा एकदा गजबजणार आहे. पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू होणार असल्याने गणेशभक्तांचा प्रवास अधिकच सुखकर हाेणार आहे.
गतवर्षी दिनांक २२ मार्चपासून काेराेनामुळे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रत्नागिरी- दादर आणि दिवा-सावंतवाडी या दाेन्ही पॅसेंजर बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर काही दैनंदिन एक्स्प्रेससह हंगामी गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, दोन्ही पॅसेंजर बंदच होत्या. दोन्ही पॅसेंजर सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी सुरू होती; पण कोकण रेल्वे प्रशासनाने त्या मागणीकडे लक्ष दिले नव्हते. दरम्यान, गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे प्रशासनाने चार नियमित गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दोन पॅसेंजरना एक्स्प्रेसचा दर्जा दिला जाणार आहे. प्रदीर्घकाळ बंद असलेल्या दोन्ही पॅसेंजर पुन्हा सुरू होणार असल्याने कोकणातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.