लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन सुरू केले आहे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे, यासाठी पोलीस यंत्रणा आता अहोरात्र रस्त्यावर उभी आहे. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जिवाला धोका असतानाही ही यंत्रणा नागरिकांचे रक्षण करीत आहे. मात्र, घरच्यांना त्यांची काळजी सतत वाटतेय. एरव्ही आपल्याशी गप्पा मारणारे, फिरायला नेणारे, चाॅकलेट अन् आइस्क्रीम आणणारे आपले बाबा आता लवकर का घरी येत नाहीत, फिरायला का नेत नाहीत, जवळ का घेत नाहीत, असे असंख्य प्रश्न सध्या त्यांच्या मुलांना पडलेत.
तस पाहिलं तर मोर्चे, चोरी, खून असे काही घडले की, पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री कर्तव्यावर जावे लागते. निवडणुकांच्या काळातही या यंत्रणेवर ताण येत असतो. लोक सण साजरे करताना पोलीस कर्मचारी सण शांततेत साजरा व्हावा, यासाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर गस्त देत उभा असतो. आता लाॅकडाऊनमध्ध्ये दिवसरात्र कर्तव्य करणारे पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या मुलांना आपल्या बाबांच्या आरोग्याचीही खूप काळजी वाटतेय.
मला बाबांची सारखी काळजी वाटते म्हणून ते घरी कधी येणार? असं मी सतत फोनवरून विचारत असतो. उन्हातून फिरू नका, असे सांगत असतो. बाबांना रविवारचीही सुटी का देत नाहीत, असं विचारत असतो.
- अस्मित (उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांचा मुलगा)
बाबा घरी लवकर या. एवढा वेळ काय करतायं? रविवारचीही सुटी नाही का, असं विचारतो. हाॅस्पिटलला जाऊ नका, काळजी घ्या, असं सारख सांगतो. बाबांना मिठी मारता येत नाही, म्हणून आम्ही नाराज असतो.
- गार्गी व ऋचा (शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या कन्या)
बाबा व आई लवकर या घरी, ऑफिसला जाऊ नका. बाहेर गेलात तर पोलीस गाडीत घालून घेऊन जातात. घरी येताना आइस्क्रीम व चाॅकलेट तरी आणत जा. बाहेर फिरायला तरी घेऊन जा ना, असं सांगतो.
- प्राज्ञाय (शहर सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांचा मुलगा)
बाबांशी काही गोष्टी शेअर करायचा असतात, त्या करता येत नाहीत. कोविडमुळे बंधन आली आहेत. आधी मी व बाबा बाहेर फिरायला जायचो, पण आता कोविडमुळे ते पण कुठेही जाता येत नाही.
- प्राजक्ता (वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांची कन्या)