राजापूर : राज्य सरकारने कोरोनाविषयक निर्बंधांमध्ये शिथिलता आणून एसटीच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा दिली असल्याने राजापूर आगारातून रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणांसह तालुक्यातील अनेक फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खेड : कोकणातील खेड, चिपळूण, महाड परिसरात झालेल्या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे महिला आघाडी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली. आघाडीच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नामगजर एक्का उत्साहात
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवेची ग्रामदेवता तळेकरीन देवीचा नामगजर एक्का कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करून उत्साहात संपन्न झाला. ग्रामस्थ, खोत, गावकर, भाविक आदी मान्यवर धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंद फेऱ्या पूर्ववत करण्याच्या सूचना
देवरुख : रस्ते खचल्याने बंद पडलेल्या फेऱ्या पूर्ववत करण्याच्या सूचना संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांनी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम, आगार व्यवस्थापकांशी माने यांनी चर्चा केली.
केंद्र सुरू करण्याची मागणी
साखरपा : साखरपा बाजारपेठेत आधार कार्ड अपडेट केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. सध्या वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी आधार कार्डची सक्ती केली जात आहे.