थेट गावातच एसटी
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी दि. १४ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.गावातील प्रवाशांनी तालुक्याच्या आगार प्रमुखांकडे ग्रुप बुकिंगसाठी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी सुनील भोकरे यांनी केले आहे. ग्रामस्थांनी ग्रुप बुकिंग केल्यास गावातच एस.टी. बस पाठविणे सोयीस्कर ठरणार आहे.
खड्डे भरण्यास प्रारंभ
दापोली : नगरपंचायतीतर्फे शहरातील मुख्य व अंतर्गत मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खड्ड्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्डे भरण्याची मागणी नागरिकांतून गेले कित्येक दिवस जोर धरू लागली असून, नगरपंचायतीला ऐन गणेशोत्सवात मुहूर्त सापडला आहे.
विद्यार्थ्यांमधून नाराजी
रत्नागिरी : पदविका अभ्यासक्रम जुलैमध्ये सुरू होतात. परंतु, पदवी, पदविका अभ्यासक्रम अद्याप सुरू झालेले नसून अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये पहिले सत्र संपणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनामुळे वेळापत्रकात बदल झाला आहे.
नारळाचा खप
रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे नारळाचा खप वाढला आहे. गतवर्षीपेक्षा नारळाच्या दरात एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. गावठी नारळ २० ते ४० रुपये दराने विकण्यात येत आहेत. तामिळनाडू, आंध प्रदेश येथील नारळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. गणेशोत्सवामुळे नारळाला वाढती मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत.