रत्नागिरी : हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन मुस्कानमुळे आठ मुलांना कुटुंब मिळाले आहे. हरवलेल्या अथवा कुटुुंबातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. गाझियाबाद पोलिसांनी ‘आॅपरेशन स्माईल’ या नावाने हरवलेल्या मुलांना शोधणे व त्यांचे पुनर्वसन करण्याची मोहीम यशस्वीरित्या राबवलेली होती. त्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्याालयाने जानेवारी २०१५मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी अशीच मोहीम हाती घेण्याची सूचना सर्व राज्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व राज्यांमध्ये १ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. १९ जुलै रोजी गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली कल्याण, जिल्हा ठाणे येथील एक १७ वर्षीय मुलगा हा गुहागर एस. टी. स्टॅण्ड येथे फिरत असताना मिळाला. २५ जुलै रोजी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय अहमदाबाद राज्य गुजरात येथील मुलगी लग्न करण्याकरिता गुजरात येथून राहत्या घरातून पळून आली होती. ती पेट्रोलिंगच्या वेळी चिपळूण रेल्वेस्टेशनवर पोलिसांना सापडली. २७ जुलै रोजी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडूप पोलीस ठाणे, मुंबई यांच्याकडे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेली असलेली १७ वर्षीय मुलगी गोरेगाव लिंकरोड ही गोळप नवेदरवाडी रत्नागिरी येथे पेट्रोलिंगच्या दरम्यान सापडली. नाटे सागरी पोलीस ठाणे हद्दीत तीन भावंडे दीपा (१३), रुपेश (११), श्याम (८) (तीनही नावे बदललेली) ही मुले १३ जुलै रोजी हरवलेली होती. वेत्ये ते केळशी, ता. राजापूर दरम्यान पेट्रोलिंग करताना ती सापडली. २९ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरण (नाव बदललेले) गोरेगाव, जि. जयगड, अभिजीत (१४, नाव बदललेले, गोरेगाव, जि. रायगड) हे घरातून कोणालाही न सांगता निघून आले होेते. ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आढळले. आपॅरेशन मुस्कान या मोहिमेमध्ये एकूण आठ बालकांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. (वार्ताहर)सापडलेल्या मुलांमध्ये एकाच घरातील तीन भावंडांचा समावेश. सर्वात प्रथम मोहीम राबविताना गुहागर पोलीस ठाणे हद्दीत यश. शोध घेण्यात आलेल्या मुलांमध्ये अपहरण झालेल्या मुलीचा समावेश.
‘आॅपरेशन मुस्कान’मुळे सहा कुटुंबे सुखावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 00:13 IST