चिपळूण : स्वातंत्र्यदिनी झिरो बँक बॅलन्सने बँक खाती उघडली. योगायोगाने त्या दिवशी लाल किल्ल्यावरुन जाहीर झालेली पंतप्रधान जनधन योजना, त्यातून मिळालेलं विनाहप्ता १ लाखाचा अपघाती विमा कवच, त्याचं रुपे कार्ड व पाऊच बॅग्ज वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी वंचितांच्या वस्त्यांवर झाला. बँक आॅफ इंडिया, चिपळूण शाखा व दिशान्तर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमातून वंचितांच्या वाडीवस्त्यांवरील बांधवांना बचतीचा कृतियुक्त अभिनव पास मंत्र देण्यात आला. दिशान्तर संस्थेने एका तपाहून अधिक काळ आदिवासी वस्तीवर काम सुरु ठेवले आहे. निवारा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सोयी सुविधा, तंत्रज्ञान देत वस्तीविकासाचे प्रयत्न सुरु ठेवले आहे.राज्यातील आदर्शवत आदिवासी वस्ती म्हणून निरबाडे खिंडवाडीची गणना होऊ लागली. संस्थेला काय वाटते, यापेक्षा वाडीवस्तीवरील माणसांच्या मागणीनुरुप काम सुरु ठेवण्यात आले. यातून विविध शासकीय योजनांचे अर्ज भरताना बँक खाते हा विषय पुढे आला. झिरो बॅलन्सने बँक खाती उघडून मिळावीत व तीदेखील वाडीवस्तीवर येऊन बँकेने हे काम करावे, असा दिशान्तरचा प्रयत्न होता. त्याला बँक आॅफ इंडिया, चिपळूणचे शाखा व्यवस्थापक प्रभाकर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वस्तीवरच्या कामात कुण्या वित्तीय संस्थेने कृतियुक्त सहभाग दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. पासबुक वितरणाचे काम संपवून ही टीम परतत असताना पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरुन जनधन योजनेची घोषणा केल्याचे वृत्त त्यांच्यापर्यंत आले.आता रुपे कार्ड वितरण करण्यासाठी बँक आॅफ इंडिया चिपळूण शाखा व्यवस्थापक पाटील हे त्यांचे सहकारी रितेशकुमार, व्यवसायवृद्धी सहाय्यक तथा बँकमित्र संदीप पाटील यांच्यासह निरबाडे वस्तीवर आले. मंगळवारी सायंकाळी उशिराने कामावरुन या कार्यक्रमासाठी जमलेल्या निरबाडेखिंड व राजावाडी या दोन वस्तीवरच्या आदिवासी-कातकरी बांधवांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. रुपेकार्डचा वापर व दक्षता, बचत गटाला सहकार्याचा शब्द असे सांगत पंतप्रधानांनी आर्थिक समावेशकतेसाठी जनधन योजना आणली असल्याचे सांगितले. ४५ दिवसात हे कार्ड वापरले गेले, तरच १ लाख रुपयांच्या अपघाती विमा योजनेचा लाभार्थी होता येईल. संदीप पाटील यांनी या मशिनची माहिती दिली. (प्रतिनिधी)
वंचित वस्त्यांवर बचतीचा आॅनलाईन मंत्र
By admin | Updated: April 17, 2015 00:09 IST