रत्नागिरी : जन्म - मृत्यू व नमुना ८ (अ) या संग्राम सॉफ्टमधील नोंदणीप्रमाणेच करावयाच्या कामांतर्गत जिल्ह्यातील नमुना ८ (अ)च्या नोंदणीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींमध्ये ६४५ डाटाएंट्री आॅपरेटर कार्यरत आहेत. गेल्या आठवडाभरात (१९ जूनपासून) जन्म - मृत्यूच्या दीड लाख नोंदी झाल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या जन्म-मृत्यू नोंदीची संख्या साडेतीन लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सुत्रांकडून देण्यात आली. चार दिवसांपूर्वीच या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून शून्य काम करणाऱ्या चार ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. काळम यांनी निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर या नोंदीच्या कामांना जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये वेग आला आहे. आपल्यावरही अशी कारवाई होऊ नये, या भीतीने ग्रामसेवक, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच जन्म-मृत्यू व नमुना ८ (अ)च्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याने व या अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता वाढली असल्याने कर्मचाऱ्यांसह, अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
आठवडाभरात दीड लाख नोंदी
By admin | Updated: June 27, 2014 01:07 IST