रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडोम येथील बहुचर्चित घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील ग्रामस्थांना कोणत्याही समस्यांना सामोेरे जावे लागू नये, याची पुरेपूर काळजी पालिकेकडून घेतली जात आहे. त्यामुळेच नगरपरिषदेचे अधिकारी, आरोग्य विभाग कर्मचारी व प्रकल्पाच्या कामासाठी नेमलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक येत्या चार दिवसात गोवा येथील घनकचरा प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. दांडेआडोम येथे अडीच हेक्टर क्षेत्रात रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्प होणार आहे. या जागेकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या आता सुटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांशी सामंजस्याने हा प्रकल्प व्हावा, असा रत्नागिरी नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. साडेचौदा कोटींच्या या प्रकल्पासाठी दांडेआडोम व फणसवळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता जागा संपादित होऊन ताब्यात मिळाल्याने, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रक्रियेला वेग दिला आहे. ज्या एजन्सीमार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे, त्या एजन्सीने गोवा येथे १० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे २ घनकचरा प्रकल्प राबविले आहेत. हे प्रकल्प नेमके कसे चालतात, प्रकल्प चालवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यात काही अडचणी आल्या आहेत का, प्रदूषण होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे, याबाबतची पाहणी हे पथक करणार आहे. याच एजन्सीने गोव्याबरोबरच सोलापूर व पुणे येथेही घनकचरा प्रकल्प उभारून दिले आहेत व ते चांगल्या प्रकारे सुरू असल्याचा एजन्सीचा दावा आहे.या घनकचरा प्रकल्पांचा अभ्यास अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत. या प्रकल्पाची सखोल माहिती घेतली जाणार आहे. त्या धर्तीवर हा घनकचरा प्रकल्प उभारण्याचा रत्नागिरी पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी हा दौरा करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी पालिका सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)सांडपाण्याच्या व्यवस्थेवर अभ्यासरत्नागिरी नगरपरिषदेतर्फे होऊ घातलेल्या दांडेआडोम घनकचरा प्रकल्पातील सांडपाणी, डोंगर उताराची जमिन असल्याने, नंतर झिरपून गावातील विहिरींचे पाणी प्रदूषित होईल, अशी भीती तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गोव्यातही असाच एक प्रकल्प असून, तेथे नेमकी काय स्थिती आहे, सांडपाण्यासाठी कोणत्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे, याचा अभ्यास या दौऱ्यात होणार आहे.
अधिकारी करणार गोवावारी
By admin | Updated: January 15, 2015 23:33 IST